मुंबई- आरे कारशेडवरून अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू आहे. यामध्येच राज्य सरकारने या कारशेडला स्थगिती दिली असताना, अंतिम अहवाल मेट्रो समितीने सादर केला आहे. त्यात म्हटल्यानुसार, ज्या ठिकाणी आरे मध्ये मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता, त्याच ठिकाणी कारशेड उभारावे, अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच या सरकारने आरे कारशेडला स्थगिती दिली. त्यामुळे आरे शेडला समर्थन करणाऱ्या भाजपने यावर आक्षेप घेत महाविकास आघाडीतील सरकारला घोटाळा करायचा आहे. त्यामुळेच आरे कारशेडला स्थगिती दिली जात आहे, असा आरोप केला होता.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडसाठी आपण नवीन समिती नेमलेली आहे. जी जागेविषयीचा पुढचा सर्व अहवाल सादर करेल. त्यानंतरच आपण निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यावर या समितीने आता अंतिम अहवाल सादर करत करशेड येथेच सुरू व्हायला हवे, असा अहवाल दिला आहे.
यावर भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले की, मेट्रो कारशेड समितीने आपला अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे सोपवला आहे. त्यात समितीने म्हटले आहे की, मेट्रो कारशेड हे आरेच्या ठिकाणीच व्हायला हवे. त्यामुळे या कामाला 60 दिवसाचा विलंब या सरकारने दिलेल्या स्थगितीमुळे झाला आहे. 600 कोटींचा अधिक खर्च झाला आहे. त्यामुळे आता समितीने सादर केलेल्या अहवालानुसार ठाकरे सरकारने स्थगिती मागे घ्यावी, अशी मागणी सोमैया यांनी केली आहे.