महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटीच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवच; एसटी महामंडळाचा निर्णय

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना महामंडळाकडून 50 लाख रुपयांची विमा कवच मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय विभागाने मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

एसटीच्या मृत कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळणार
एसटीच्या मृत कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळणार

By

Published : Aug 29, 2020, 9:00 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना सेवा देणाऱ्या आणि परप्रांतीयांना राज्याबाहेर सोडण्याचे काम करणाऱ्या एसटी महामंडळातील
18 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना महामंडळाकडून 50 लाख रुपयांची विमा कवच मदत मिळावी, यासाठी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय विभागाने मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना विमा कवच योजना लागू करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या या कालावधीत कर्तव्यावर असताना कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच 1 जून रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार देण्यात येणार आहे. त्यासाठी कोरोना चाचणी अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे तातडीने पाठवण्यात यावे असे आदेश सर्व कार्यशाळा व्यवस्थापक यांना पाठवण्यात आले आहेत.

लॉकडाऊन कालावधीत एसटीच्या 670 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 436 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्रात राहणाऱ्या अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याचे काम एसटी मंडळाने केले. त्यात मुंबई आणि ठाणे विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या वारसांना विमा कवच रक्कम अद्याप मिळाली नसल्याची तक्रार महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने केली होती. 1 जून रोजी काढलेल्या परिपत्रकातील अटी व नियमानुसार विमा कवच दिल्यास अनेक मृत कर्मचाऱ्यांचे वारसदार त्यापासून वंचित राहतील. त्यामुळे मृत कर्मचाऱ्यांना अटी न घालता त्यांच्या वारसदारांना विमा कवच देण्यात यावे, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details