मुंबई :आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणारी खावटी योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आज(बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 2013-14 पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत 100 टक्के अनुदान देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. यानुसार ही योजना एक वर्षासाठी सुरू ठेवण्यात येईल.1978 पासून ही कर्ज योजना राज्य शासनाने सुरू केली होती. मात्र, 2013-14 साली ती बंद करण्यात आली. सध्या कोविड विषाणुमुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
या योजनेत एकूण 4 हजार रुपये कुटुंब अनुदान देण्यात येईल. ज्यामध्ये 2 हजार रुपये किंमतीच्या वस्तू आणि 2 हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येईल. यासाठी 486 कोटी रुपये इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. मनरेगावरील 4 लाख, आदिम जमातीच्या 2 लाख 26 हजार कुटुंबांना, पारधी जमातीच्या 64 हजार कुटुंबांना, गरजू, परितक्त्या, घटस्फोटीत, विधवा, भूमीहीन अशा 3 लाख कुटुंबाना तसेच 1 लाख 65 हजार वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या अशा 11 लाख 55 हजार कुटुंबांना याचा फायदा मिळेल. खावटी अनुदान योजनेत एका कुटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती असा 2 हजार रुपये पर्यंतचा किराणा देण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून अपर मुख्य सचिव (वित्त) हे त्याचे अध्यक्ष असतील. तर, योजनेच्या विभागीय स्तरावरील अंमलबजावणीसाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास हे अध्यक्ष असतील.
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती
एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे 2019-20 या शैक्षणिक वर्षात खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांऐवजी खासगी विनाअनुदानीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. अशा 112 बाधित विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 7 कोटी 49 लाख 38 हजार 600 रुपये प्रतिपूर्ती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. या संदर्भातील शासन निर्णय 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून कार्योत्तर मान्यता देण्यात आली. एकूण 33 कोटी 6 लाख 23 हजार 400 इतकी प्रतिपूर्तीची एकूण रक्कम होणार आहे. याचा लाभ 6 वैद्यकीय / दंत पदव्युत्तर 3 वर्षे कालावधीच्या पदवीसाठी तसेच 4.5 वर्षे कालावधीच्या 106 पदवी विद्यार्थ्यांना होणार आहे.
अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना मोफत एक किलो चणाडाळ
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यात अख्या चण्याऐवजी डाळ घेण्यास अधिक पसंती असल्याचे निदर्शनास आले असून अनेक लोकप्रतिनिधीनी यासंदर्भात विनंती केली आहे. यास्तव हा निर्णय घेण्यात आला. सदर चणाडाळ विक्री करण्याकरिता दुकानदारांना 1 रुपया 50 पैसे प्रति किलो एवढे मार्जिन देण्यात येईल. या डाळ वितरण योजनेकरिता एकूण 73 कोटी 37 लाख इतका वित्तीय भार पडणार आहे.