मुंबई Gram Panchayat Election 2023 : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, राज्यात नुकत्याच झालेल्या 2359 ग्रामपंचायतीचा निकाल हाती येत आहे. या निकालापैकी 723 जागांवर चा निकाल स्पष्ट झाला असून या निकालामध्ये महा युतीने दणदणीत यश संपादन केलंय. 723 जागांपैकी 432 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे तर केवळ दीडशे जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं आहे, असा दावा केशव उपाध्ये यांनी केलाय.
उद्धव ठाकरे सर्वात शेवटी :पक्षीय बलाबल पाहता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने नेहमीप्रमाणे शेवटचा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल आपण त्यांचे विशेष अभिनंदन करतो असा टोला उपाध्ये यांनी लगावला. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या जागांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 210 शिवसेना शिंदे गटाला 110 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 121 काँग्रेसला 65 शरद पवार गटाला 51 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 34 जागांवर समाधान मानावे लागले आहे, त्यामुळे दररोज सकाळी राज्यात जनतेला ओरडून सांगून निवडणुका घ्या मग दाखवू असे म्हणणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे असंही उपाध्य म्हणाले.