मुंबई : शिवडी टीबी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईतील परळ येथील प्रसिद्ध अशा केईएम रुग्णालयात शिकणाऱ्या एका डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. आदिनाथ पाटील असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टराचे नाव आहे. आज सकाळी 8.30 वाजता टीबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या रेस्ट रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आदिनाथ आढळून आला. त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. आदिनाथ पाटील हा मूळचा जळगावचा असून तो एमडी मेडिसीनचे वैद्यकीय शिक्षण घेत होता.
रेस्ट रूममध्ये आदिनाथ बेशुद्ध अवस्थेत : वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांनी सांगितले की, शिवडी येथील टीबी रुग्णालयात केईएम रुग्णालयासाठी दोन राखीव वार्ड आहेत. डॉक्टरांसाठी असलेल्या रेस्ट रूममध्ये आदिनाथ बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. तर तपासणीत आदिनाथ पाटील याने इंजेक्शन घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे. रफी किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.