मुंबई :भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करायचे असा विरोधी पक्षांनी चंग बांधला आहे. भाजपविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र यावे, यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबईच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर भेट घेतली.
देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. मला असे वाटते की आम्हाला विरोधी पक्ष म्हणू नये तर केंद्र सरकारला विरोधक म्हणायला हवे कारण ते लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहेत - उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांची मोर्चेबांधणी : या मुंबई दौऱ्यात केजरीवाल आणि भगवंत मान हे उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. या आधी तेलंगाणाचे मुख्यमंत्री सी. चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हणाले होते. अरविंद केजरीवालही त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी 23 मे रोजी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याची भेट घेतली होती. त्यानंतर ते संध्याकाळी मुंबईत दाखल झाले आहेत.
केंद्राविरोधात केजरीवाल यांची मोहीम :अधिकाऱ्यांच्या बदलीवर राज्य सरकारचा अधिकार असेल, तसेच प्रशासनाचे अधिकार देखील राज्याकडे राहतील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन फक्त 8 दिवस झाले. या दिवसात केंद्राने अध्यादेश आणत न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. दिल्ली हे पूर्ण राज्य नाही, त्यामुळे सर्वोच्च अधिकार हे केंद्राकडे असावेत, असे केंद्राचे म्हणणे आहे. केंद्राच्या अध्यादेशात हेच सांगत केंद्राने अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार उपराज्यपालांकडे दिले आहेत. केंद्राचा अध्यादेश राज्यसभेत नामंजूर करण्यात यावा यासाठी केजरीवाल मोर्चेबांधणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती.
हेही वाचा -
- Youth Voters In Maharashtra : युवा मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपाचे विशेष प्रयत्न
- PM Modi Degree : केजरीवाल आणि संजय सिंह न्यायालयात हजर झाले नाहीत, या तारखेला होणार पुढील सुनावणी
- Mumbai BJP : विनोद तावडे, आशिष शेलार यांना बळ; भाजपा मुंबईत खेळणार का मराठा कार्ड?