मुंबई-परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करुन कृत्रिम श्वासोच्छवास (व्हेंटिलेटर) दिला होता. मात्र, काही वेळाने तो रुग्ण दगावला. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत व्हेंटिलेटर सुरू करण्यास भाग पाडले. या दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी निवासी महिला डॉक्टरला शिवीगाळ केली होती. मृत रुग्णाचा इलैक्ट्रोकार्डियोग्राफी (इसीजी) काढल्यानंतर त्या रुग्णाचे हृदय बंद असल्याचे समोर आले व डॉक्टरांनी पुन्हा त्याला मृत घोषित केले. मात्र, याप्रकरणी अर्धसत्य असलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणानंतर निवासी डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी कडक कारवाईची मागणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेकडून होत आहे. आज महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी मार्डने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तर राज्याच्या गृहमंत्र्यांनाही पत्र लिहीत रुग्णाच्या नातेवाईकांवर आणि सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा-'राज्यात 13 टक्के रुग्ण 'ऑक्सिजन'वर! मात्र, प्राणवायू कमी पडू दिला जाणार नाही'
केईएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये एका 18 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाला फिट येत होत्या. त्याला आधी एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची तब्येत प्रचंड खालावल्यानंतर 7 सप्टेंबरला त्याला केईएममध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता, त्यामुळे त्याला त्वरित व्हेंटिलेटरची गरज लागल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रुग्णाला फिट येत होत्या तर त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड कमी झाली होती. त्यामुळे त्याला मिनिटाला 15 लिटर ऑक्सिजन लागत होते. तरी त्याची प्रकृती खालावत चालली होती, याची माहिती डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती. या रुग्णाला वाचवण्यासाठी सर्व शर्थीचे प्रयत्न केले जात होते. मात्र, 9 सप्टेंबरला रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.