मुंबई:देशाच्या राजकारणात बदल करण्याच्या उद्देशाने केंद्रातील भाजप सरकारवर ताशेरे ओढणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी ते मुंबईत येत आहेत. देशाचे राजकारण, केंद्र-राज्य संबंध आणि पुढील वाटचालीबाबत ते दोन्ही नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
भाजपविरोधी आघाडी स्थापनेसाठी
केंद्रात भाजपविरोधी आघाडी स्थापनेसाठी पाठिंबा मिळवण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून केसीआर आज मुंबईत येत आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. ते विशेष विमानाने मुंबईत येत आहेत. त्यांच्यासमवेत वित्त आणि आरोग्य मंत्री हरीश राव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष विनोद कुमार आणि तेरेसा संसदीय पक्षाचे नेते के केशवराव असणार आहेत.
ठाकरेंचा केसीआर यांना पाठिंबा
दोन्ही मुख्यमंत्र्यांनी बुधवारी फोनवरून भेटी संदर्भात प्राथमिक चर्चा केली होती. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचे धोरण, राज्यांबाबतच्या वृत्तीवर योग्य वेळी आवाज उठवल्याचे सांगत ठाकरे यांनी केसीआर यांना पाठिंबा दर्शवला. तसेच राज्यांच्या हक्कांसाठी, देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते तसेच यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार केसीआर रविवारी दुपारी 1 वाजता मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
वर्धा बॅरेजच्या कामावरही चर्चा
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांना कडाडून विरोध केला आहे. केसीआरही भाजपविरोधात झेंडा फडकवत आहेत. त्यांनी आंध्र, तेलंगणा विभाजनाच्या हमींची पूर्तता न करणे आणि धान्य खरेदीवर असहकार यांसारख्या मुद्द्यांवर केंद्राच्या भूमिकेचा जाहिर निषेध केलेला आहे. केसीआर आणि ठाकरे यांनी या सर्व घडामोडींवर चर्चा करताना भाजपवर प्रतिहल्ला करण्याची योजना आखु शकतात असे मानले जात आहे. याशिवाय गोदावरी नदीवरील वर्धा बॅरेजच्या बांधकामावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. बॅरेज बांधण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये यापूर्वीच करार झाला आहे. त्याच्या जागी तेलंगणाने कमी उतार असलेल्या वर्धा येथे बॅरेज बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे.
एकत्रित प्रयत्नांसाठी पवारांची मदत
केसीआर दुपारी ४ वाजता शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. केसीआर यांचे पवारांशी चांगले संबंध आहेत. पवारांनी वेगळ्या तेलंगणा राज्याच्या निर्मीतीसाठी पाठिंबा दिला होता. ताज्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या धोरणांच्या विरोधा साठीच्या एकत्रित प्रयत्नांसाठी पवारांची मदत घेणार आहेत. देशातील राजकीय घडामोडी, भाजपची राजवट, लोकशाहीविरोधी धोरणे आणि देशाचे होत असलेले नुकसान याबद्दल ते चर्चा करणार आहेत. केसीआर यांच्या ठाकरे पवारांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केसीआर यांच्या चाहत्यांनी मुंबईत विविध ठिकाणी केसीआर उध्दव ठाकरे यांच्या भेटीचे फ्लेक्स लावले आहेत.
इतरही राज्यांचा दौरा करणार
सीएम केसीआर यांनी यापूर्वी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासोबत बिगर-भाजप पक्षांकडून पाठिंबा मिळवण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन हैदराबादमध्ये आले तेव्हा केसीआर यांनी त्यांची भेट घेतली होती. ठाकरे, पवार यांच्या भेटीनंतर ते बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.