मुंबई - बालभारतीच्या मराठी कवितांचा रंगमंचीय अविष्कार "कट्टी बट्टी" या नावाने गंधार या संस्थेने साकारला आहे. आज शुभारंभाच्या प्रयोगात 30 बच्चे कंपनीने सादर केलेल्या हाउसफुल परफॉर्मन्सने शिवाजीमंदिरचे सभाग्रह दणाणून सोडले. या "कट्टी बट्टी ने सगळ्यांचे सुट्टी केली" अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी या बच्चे कंपनीचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर स्वतः कडून वैयक्तिक 1 लाख 1 हजार रूपयांचे बक्षीस संस्थेला जाहीर केले.
मराठी बालभारतीचे पुस्तक दप्तरात दुमडून पडू नये, त्यातील कवितेचा आस्वाद कवी मनाने बालमनाला घेता यावा, याकरीता हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, म्हणून ठाण्यातील गंधार या संस्थेने 'कट्टी-बट्टी' हा रंगमंचीय नृत्यनाट्य आणि काव्यवाचनाचा अविष्कार साकारला आहे. या रंगमंचीय आविष्काराचे दिग्दर्शन प्रा. मंदार टील्लू यांनी केले आहे. आज शुभारंभाचा प्रयोग शिवाजी रंग मंदिर, दादर येथे मोठ्या गर्दीत आणि शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड आशिष शेलार यांच्यासह आ. संजय केळकर, अशोक हांडे, विजय गोखले आणि अशोक पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
शिक्षणमंत्र्यांनी बच्चे कंपनीने सादर केलेल्या या अविष्काराचे कौतुक करत 1 लाख 1 हजार रुपयांचे वैयक्तिक बक्षिस जाहीर केले. तर गंधार संस्थेने या उपक्रमातून खर्च वजा जाता उरलेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे जाहीर केले. तर या प्रयोगातून 51 हजार रुपये पुरग्रस्तांसाठी देण्यात येईल, असे गंधारतर्फे प्रा. मंदार टील्लू यांनी जाहीर केले.