मुंबई :कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने कसबा पेठ व पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागेवर २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. भाजप नेत्यांकडून या दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस इथे निवडणूक घेण्यास उत्सुक आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपापली तयारी करण्याची मुभा आहे.
शिवसेना आणि कॉंग्रेसशी बोलणार :पिंपरी- चिंचवड विधानसभा संदर्भात ८ ते ९ लोकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांच्याशी मी प्रत्यक्षात बोलल्यानंतर निर्णय घेतला जाईल. तसेच कसबापेठमध्ये काँग्रेस तयारी करत आहे. महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना कसबापेठ ही विधानसभा जागा काँग्रेसच्या वाट्याला होती. तरीसुद्धा पुण्यात गेल्यानंतर मी सहकार्याशी बोलेन. गुरुवार व शुक्रवार दोन दिवस आपण पुण्यात जाणार आहोत. त्यानंतर सहकाऱ्यांसह शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांशी सुद्धा बोलणार आहेत, असे अजित पवार म्हणाले.