कर्नाटक निवडणूक प्रचाराविषयी स्थानिक नेत्यांची प्रतिक्रिया मुंबई:कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपते आहे. येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे; मात्र बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती गावांमध्ये नेहमीच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि अन्य राजकीय पक्षांमध्ये टक्कर पाहायला मिळते. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील बिदर, भालकी, निपाणी, संगमेश्वर आणि खानापूर या तालुक्यांमध्ये असलेल्या मराठी भाषिक मतदारांना मतदानासाठी विविध पक्षांकडून आवाहन केले गेले; परंतु आपापल्या पक्षाच्या वतीने आवाहन करायला गेलेल्या नेत्यांना स्थानिक मतदारांनी चांगलाच धडा शिकवल्याचे पाहायला मिळाले.
कोणते नेते प्रचारात?महाराष्ट्रातील अनेक नेते बेळगावात प्रचारासाठी दाखल झाले होते. यामध्ये भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चित्रा वाघ, प्रसाद लाड यांनी प्रचार केला. काँग्रेसच्या वतीने सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण हे प्रचारात उतरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर शेवटच्या अडीच दिवसांमध्ये भाजपच्या वतीने प्रचारात उडी घेतली; मात्र अन्य नेत्यांप्रमाणे त्यांनी सीमावर्ती भागात प्रचार करण्याचे टाळले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीसुद्धा भाजपसाठी प्रचार केला. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला होता.
काय पडला प्रभाव?महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एकदा सीमावर्ती भागात जोर धरत आहे. या समितीने स्थानिक भागात पाच उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या विरोधात प्रचार करायला आलेल्या प्रणिती शिंदे आणि अशोक चव्हाण या काँग्रेस नेत्यांच्या सभा उधळून लावण्यात आल्या. त्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. प्रत्येक पक्षाच्या वतीने त्यांच्या-त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करायला आलेल्या या नेत्यांना आपण योग्य भाषेत उत्तर दिले असून स्थानिक मराठी मतदार हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने बहुतांश प्रमाणात आहे. त्याचाच फायदा होईल हे पुन्हा एकदा आम्ही दाखवून दिले, असे समितीचे सुरज कंबरकर यांनी सांगितले. त्यामुळे विरोधी नेत्यांच्या प्रचारांमध्ये काहीही प्रभाव पडणार नाही, असा ठाम दावा त्यांनी केला.
कोणाचा कुठे प्रचार?काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सतेज पाटील, सुनील केदार, प्रणिती शिंदे यांनी उडपी आणि परिसरात येऊन प्रचार केला. तसेच बेळगाव परिसरातही त्यांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र या प्रचारसभांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उडपी येथे येऊन परिसरातील उमेदवारांचा प्रचार केला; परंतु हे सर्व नेते महाराष्ट्रात असताना मराठी भाषिकांबद्दल दाखवणारे प्रेम आणि कळवळा निवडणुकीच्या माध्यमातून दाखवत नाहीत. मराठी माणसाचा आवाज विधानसभेत बुलंद करण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांकडून मदतीची अपेक्षा आहे; मात्र हे नेते स्वतःच्या पक्षासाठी इथे येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करतात. या नेत्यांना वास्तविक लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविंद्र पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा:Abdul Sattar on Sanjay Raut : 'त्या' महाकुत्र्याला राज्यसभेवर आम्हीच पाठवलं; अब्दुल सत्तारांची जीभ घसरली