मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या दररोज एक ट्विट करून खळबळ उडवून देत आहे. काल शिवसेना आपल्याला मुंबईत येऊ नकोस अशी धमकी देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आज तिने अमुक-अमुक तारखेला आपण मुंबईत येत असून ज्याच्यात हिम्मत असेल त्याने आपल्याला रोखून दाखवावं, असे म्हणत शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात दररोज खळबळजनक खुलासे करणाऱ्या कंगणाने यावेळी शिवसेनेला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काल शिवसेना नेते संजय राऊत आपल्याला मुंबईत पाय ठेवून नकोस सांगत धमकावत असल्याचं ट्विट तिने केलं होतं. याच ट्विटमध्ये तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. मात्र, आज यापुढे जाऊन या तारखेला आपण मुंबईत येत असून शक्य असेल तर आपल्याला रोखून दाखवावं अस सांगत शिवसेनेला उघड उघड आव्हान दिले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाला आव्हान देऊन कंगणाला नक्की काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न आता पडायला लागला आहे.