मुंबई : कांदिवली पोलिसांकडून अटक करण्यात आलेला आरोपी, मेरठहून मुंबईत मोठ्या दरोड्याच्या तयारीत आला होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांना त्याचा सुगावा लागला. दरोड्याची घटना घडण्यापूर्वीच आरोपीला पोलिसांनी देशी कट्टा, जिवंत काडतुस, दोन कार आणि एक अॅक्टिव्हासह अटक केली.
दुकान लुटल्याचे झाले निष्पन्न : आरोपीकडून जप्त केलेल्या दोन्ही कार दिल्लीतून चोरल्या आहेत. दोन्ही गाड्यांवर मुंबईतील दुसऱ्या वाहनाची डुप्लिकेट नंबरप्लेट लावून तो दरोड्यासाठी रेकी करत होता. त्याच्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने दरोडा टाकण्यासाठी गाडीचा वापर केल्याचेही सांगितले. २०२० मध्ये समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून, आरोपींनी दागिन्यांचे दुकान लुटल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच दीड वर्ष मुंबईच्या तुरुंगात राहिल्यानंतर, आरोपी प्रथम मेरठला गेला. तिथून देशी कट्टा विकत घेतला. नंतर दिल्लीला गेला आणि तिथून कार चोरली. त्यानंतर मोठे टार्गेट करण्यासाठी मुंबईत आला, पण त्यापूर्वीच कांदिवली पोलिसांनी त्याला अटक केली.
छापा टाकून एकास पकडले :पोलीस निरीक्षक हेमंत गिते यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, एक व्यक्ती हा कांदिवली पोलीस ठाणे हद्दीत गावठी कट्टा घेवून येणार आहे. त्या अनुषगांने सपोनि हेमंत गिते व पथक यांनी वरिष्ठाची परवानगीने कांदिवली पश्चिम मुंबई येथील, गरूडा पेट्रोल पंपसमोर मेरेडियन बार, फुटपाथवर लिंक रोड, कांदिवली पश्चिम या ठिकाणी छापा टाकून एकास पकडले. त्याच्याकडे विनापरवाना गावठी कटटा, व ०१ काडतुस हे अग्नीशस्त्र मिळून आले. त्याच्या विरुद्ध कांदिवली पोलीस ठाणे गु.र.क्र. ४८५ / २०२३ कलम ३, २५ भारतीय हत्यार बंदी कायदा सह ३७ (१) (अ) १३५ महा. पो. कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल: एक गावठी कट्टा व १ जिवंत काडतुस अंदाजे किंमत २,५०० रूपये, एक निळ्या रंगाची एक्सेस मोटार सायकल अंदाजे किंमत ५० हजार रूपये, एक पांढऱ्या रंगाची इटरिगा मोटार कार अंदाजे किंमत ५ लाख रुपये, एक पांढऱ्या रंगाची होंडा, अंदाजे किंमत ४ लाख रुपये, इतका मुद्देमाल हस्तगत केला.
हेही वाचा -
- Anjangaon Surjee : अंजनगाव सुर्जी येथे पुन्हा पिस्तुलसह सहा जिवंत काडतूस जप्त
- Dhule Crime : चार गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त, साताऱ्याच्या दोन संशयितांना धुळ्यात पकडले