मुंबई - काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सोमवारी (28 जुलै) काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे शिवसेना ते काँग्रेस पर्यंतच्या प्रवासातील समर्थक म्हणून ओळखले जातात.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कालिदास कोळंबकर यांनी राजीनामा सुपूर्द केला. कोळंबकर बुधवारी ३१ जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्यापूर्वीच नारायण राणे भाजपतर्फे राज्यसभेवर गेले. त्यामुळे कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशावर अनेकदा चर्चा होऊनही त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला होता.
विधानसभेच्या निवडणुकांना काही महिने असताना कोळंबकर यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.