मुंबई- ज्युनिअर मेहमूद यांचे ६७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. पोटाचा कर्करोग चौथ्या टप्प्यात असताना त्यांच्यावर टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरलीय.
- मागील अनेक दिवसांपासून पोटाच्या कॅन्सरशी लढा देणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांची आजाराशी झुंज अयशस्वी ठरली आहे. ज्युनिअर महमूद यांचं काल (गुरुवारी) रात्री निधन झालं आहे. ज्युनिअर महमूद यांचे जवळचे मित्र सलाम काजी यांनी ज्युनिअर महमूद यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
पाच दशकांहून अधिक काळ चित्रपट सृष्टीत- ज्युनिअर मेहमूद यांचे मूळ नाव नईम सय्यद होते. ज्युनिअर मेहमूद यांना पोटाचा कर्करोग चौथ्या टप्प्यावर गेल्याचं एक महिना अगोदरच माहीत पडले होते. त्यांचे जवळचे मित्र सलीम काजी यांनी सांगितलं की, ज्युनिअर मेहमूद यांना फुफ्फुसं आणि लिव्हरमध्ये कॅन्सर होता. त्यानंतर त्यांची तब्येत फार बिघडत गेली. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
- प्रसिद्ध हास्य अभिनेता जॉनी लिव्हर यांनी ज्युनिअर मेहमूद बरोबर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आपले दोस्त आणि बॉलीवूडचे अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांची दिवसेंदिवस बिघडणारी तब्येत याबद्दल माहिती देत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.
अखेरची इच्छा पूर्ण- मागील अनेक दिवसांपासून ज्युनिअर मेहमूद कॅन्सरशी झुंजत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचे मित्र आणि अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या इच्छेनुसार अभिनेते जितेंद्र व सचिन पिळगावकर या दोघांनी जुनियर मेहमूद यांची भेट घेतली होती. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीत ज्युनिअर मेहमूद यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. फक्त हिंदीच नाही तर इतर भाषांच्या चित्रपटांमधूनसुद्धा त्यांनी रुपेरी पडद्यावर आपली छाप पाडली होती. १९६८ मध्ये आलेला ब्रह्मचारी, त्यानंतर १९७० मधील सुपर हिट चित्रपट, मेरा नाम जोकर, १९७७ मधील परवरिश आणि १९८० मधील दो और दो पाच यासारख्या सुपर हिट चित्रपटांनी ज्युनियर मेहमूद यांना नवीन ओळख मिळून दिली होती.