मुंबई -मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डीन आणि विभाग प्रमुखांच्या निवृत्तीचे वय ६२ वरून अधिक वाढवू नये. कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय होत असल्याने निवृत्तीचे वय वाढवण्यास आमचा तीव्र विरोध आहे. याबाबत पालिकेने काढलेले परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे. रिक्त पदे त्वरित भरावीत, सहयोगी प्राध्यापकांना नियुक्ती पत्रे द्यावीत आदी मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षक संघटनेचे सचिव डॉ. रविंद्र देवकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
हेही वाचा -उर्जामंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली; मनसेची पोलिसांत तक्रार
पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यावेळी देवकर बोलत होते. यावेळी बोलताना, सेवानिवृत्तीचे वय वाढवू नये, या प्रमुख मागण्यांसह आमच्या इतर मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करत आहोत. रुग्णसेवा विस्कळित न होता हे आंदोलन सुरू आहे. रुग्णालयातील प्रत्येक विभागाचे एक ते दोन कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमचे इतर प्रतिनिधी रुग्णालयात सेवा बजावत आहेत. रजा टाकून आंदोलन केले जात असल्याने रुग्ण सेवेवर याचा काहीही परिणाम झालेला नसल्याची माहिती देवकर यांनी दिली.
काय आहे नेमके प्रकरण -
मुंबई महापालिका आरोग्य सेवा पुरवते. पालिकेच्या आरोग्य विभागात ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांच्याकडून पालिका रुग्णालयाचे डीन आणि विभाग प्रमुख यांच्या सेवा निवृत्तीचे वय वाढवून घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे कनिष्ठ डॉक्टरांना विभागप्रमुख आणि डीन आदी पदांवर पदोन्नती मिळणे कठीण जाणार आहे. हा कनिष्ठ डॉक्टरांवर अन्याय असल्याने त्याला विरोध केला जात आहे. याचे स्थायी समितीतही पडसाद उमटले होते. वरिष्ठ डॉक्टरांचे वय वाढवण्यापेक्षा त्यांना निवृत्ती नंतर मानद डॉक्टर या पदावर नियुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने वाद चिघळला आहे.
म्युनिसिपल मेडिकल टीचर्स असोसिएशन (एमएमटीए-एमसीजीएम) आणि असोसिएशन ऑफ फुल टाईम टीचर्स (एएफटीटी-केईएमएच) या संघटना आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.