मुंबई Jumbo Covid Center Scam :मुंबईतील कोविड केंद्रात बेकायदा आर्थिकव्यवहार झाल्याच्या आरोपात सुजित पाटकर कोठडीत आहे. याप्रकरणी आता ईडीनं न्यायालयात 8000 पानी आरोप पत्र दाखल केलंय. त्यात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून सुजित पाटकर आणि डॉक्टर बिसुरे यांचा त्यात स्पष्ट उल्लेख आहे.
8000 हजार पानांच आरोपपत्र :मुंबईभर गाजलेल्या कथित शंभर कोटी रुपयांच्या जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून केला गेला होता. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना बेकायदेशीररित्या कंत्राट दिल गेल्याचा दावा करण्यात आला. तसेच बोगस बनावट बिले दाखवून अतिरिक्त नफा मिळवला गेला, असा आरोप सुजित पाटकर आणि डॉक्टर बिसुरे यांच्यावर करण्यात आलाय. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत पीएमएलए न्यायालयात सुजित पाटकर यांना हजर करण्यात आलं होतं. त्यावेळेला अंमलबजावणी संचालनालयनं आरोपपत्र दाखल केलं. आठ हजार पानाच्या या आरोपपत्रासोबत एक सीडी देखील त्यात जोडलेली आहे. त्याची छाननी कोर्ट करणार आहे. विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्याकडं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.