मुंबई- मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब मुंबईत लालबागच्या राजासहित इतर गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे मुंबई व पुणे दौऱ्यावर असून मुंबईत पोहचल्यावर त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाला जे पी नड्डा यांनी ११ नारळाचे तोरण अर्पण केले.
मुंबईसहित महाराष्ट्रात सध्या गणपतीची बाप्पाची धूमधाम सुरू आहे. विशेष करून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठे नेते, अभिनेते त्याचबरोबर सामान्य भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रविण दरेकर आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रावर ओढवलेली सगळी संकटे दूर करावीत, अशी लालबागच्या राजाच्या चरणी नड्डा यांनी प्रार्थना केली.
मुंबईचे सर्वात जुने गणपती बाप्पा-लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर जे. पी. नड्डा यांनी मुंबईतील गिरगाव येथील सर्वात जुने गणपती अर्थात केशवजी नाईक चाळ गणेशोत्सव मंडळाला भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राच्या सुख व समृद्धीसाठी त्यांनी गणरायाकडं प्रार्थना केली. केशवजी चाळ परिसरामध्ये जे. पी. नड्डा यांचे गिरगावकरांनी मोठ्या जल्लोषात लेझीम खेळत स्वागत केले. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येथे एक छोटेखानी रोड शोसुद्धा आयोजित करण्यात आला होता. या भव्य स्वागतासाठी तसेच स्नेह आणि उत्साहासाठी नड्डा यांनी गिरगावकरांचे आभार मानले आहेत.