मुंबई :Mumbai Ganesh Dekhava: सध्या मुंबईसह राज्यात गणपती बाप्पाची धूमधाम जोरात आहे. दीड व पाच दिवसाच्या गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर गणेश भक्तांची पावलं आता दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये विराजमान गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी वळत आहेत. मुंबईतील मोठे सार्वजनिक गणेश मंडळामध्ये गणपती बाप्पाच्या भव्य दिव्य मूर्तीसोबत अनेक देखावे निर्माण केले जातात. सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर लक्ष वेधणारे, असे हे देखावे असतात. जोगेश्वरी गणेशोत्सव मित्र मंडळानं सुद्धा यंदा लोकमान्य टिळकांचा तो काळ व आत्ताची राजकीय नेत्यांची सत्तेसाठी असणारी हाव, यावर प्रकाश टाकणारा सुंदर असा देखावा तयार केलाय.
समाजात प्रबोधन करण्याचे काम :मुंबईतील गणेश मंडळ रहिवाशी संघ, जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 41व वर्षे आहे. दरवर्षी हे मंडळ सामाजिक प्रबोधनाचे देखावे बनवत आलंय. या देखाव्यातून समाजात प्रबोधन करण्याचं काम हे मंडळ करतंय. या वर्षी त्यांनी मुख्य विषयालाच हात लावलाय. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा या मागचा हेतू व आता ज्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्या मागील राजकीय नेत्यांचा हेतू, यावर अत्यंत मार्मिक शैलीत देखावा सादर केला गेलाय. हा देखावा गणेश भक्तांच्या पसंतीसही मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे.
कोणी राज्यासाठी लढत नाही :भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना रुजवलीय. त्याचप्रमाणं टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीची ज्योत पेटवली. मात्र, लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशानं गणेशोत्सव सुरू केला होता. तो स्वातंत्र्याचा उद्देश जरी सफल झाला असला तरी आज गणेशोत्सव हा फक्त देखाव्यासाठी व राजकारणासाठी राहिला आहे. जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळानं आपल्या देखाव्याची सुरुवात टिळकांच्या शब्दानीच केलीय. मी शेंगा खाल्ल्या नाही तर टरफलं का उचलू, हे लोकमान्य टिळकांनी ठामपणे सांगितलंय.