मुंबई: शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Add. Gunaratna Sadavarte) यांना अटक केली. तर १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. हे आंदोलन आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. या कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. आंदोलनात ज्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे त्या कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडली आहे.
फौजदारी गुन्हे असणाऱ्यांचे परतीचे दोर कापले! -परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अनिल परब म्हणाले, येत्या २२ तारखेंपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. २२ तारखेपर्यंत जे कामगार रुजू होतील, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. पण या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे असणाऱ्यांचे परतीचे दोर त्यांनी कापले आहेत.
एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का? -परब म्हणाले, '२२ तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाही तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का? याचा विचार ही केला जाणार आहे. पाच महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस आगाराने सर्व एसटी गाड्याची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे.