मुंबई- दरवर्षी पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे भरण्यासाठी पालिका ज्या प्लांटमध्ये कोल्डमिक्स तयार करते, त्या प्लांटमधील १२८ मंजूर पदांपैकी ८७ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कोल्डमिक्सच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यावर्षी ठरवून दिलेल्या लक्षापेक्षा ८९ टक्के उत्पादन कमी झाले असल्याचा आरोप, माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिका ही देशातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. शहरातील रस्ते बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. तर त्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वर्षाला शंभर कोटीहून अधिक निधी खर्च केला जातो. पालिका खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्सचा वापर करत होती. मात्र गेले दोन ते तीन वर्ष पालिका कोल्डमिक्स या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
गेल्यावर्षीपासून पालिकेने आपल्या वरळी येथील प्लांटमध्ये २७ रुपये प्रति किलो या दराने कोल्डमिक्स बनविण्याचा निर्णय घेतला. पालिकेकडून स्वतः बनवलेल्या कोल्डमिक्सचा वापर खड्डे बुजवण्यासाठी होत आहे. यावर्षी पालिकेने १२०० टन कोल्डमिक्स बनवण्याचा उद्दिष्ट ठेवला होते. मात्र विभाग कार्यालयात कोल्डमिक्स न मिळाल्याने खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने पेव्हर ब्लॉक आणि डेब्रिजचा वापर केला आहे.
पालिकेने बनवलेले कोल्डमिक्स मिळत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी पालिकेकडून पालिकेच्या प्लांटमध्ये किती कर्मचारी काम करतात, किती जागा रिक्त आहेत, याची माहिती मागवली होती. याबाबत माहिती देताना वरळी येथील प्लांटमध्ये एकूण १२८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ४१ कर्मचारी कार्यरत असून ८७ पदे रिक्त आहेत. या प्लांटची दिवसाला किमान उत्पादन क्षमता ५० मेट्रिक टन असून कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे दररोज सरासरी १०.२० टन कोल्डमिक्स तयार होत असल्याचे कळविण्यात आले आहे. प्लांटमध्ये पदे रिक्त असल्याने कोल्डमिक्सच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शकील अहमद यांनी सांगितले.