मुंबई - 'कोरोना' शब्द उच्चारला तरी सध्या अनेकांच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता दिसत आहे. अशावेळी आम्ही तर दहा-दहा, बारा-बारा तास कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सानिध्यात असतो. तेव्हा आमच्या चेहऱ्यावर सर्वसामान्यांपेक्षा अधिक भीती असायला हवी. पण माझ्यासारख्या नर्स, वॅार्डबॅाय आणि इतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर जराही चिंता नसते. कारण आम्ही कोरोनाला घाबरत नाही. मात्र, आम्ही काळजी घेतो आणि काळजी घ्यायला लावतो. हे शब्द आहेत जे जे रुग्णालयातील कार्यरत असणाऱ्या नर्सचे. कोरोना संशयित रुग्णांची जे जे रुग्णालयात तपासणी केली जात आहे.
कोरोनाला घाबरत नाही.. रुग्णालयातील कर्मचारी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज हेही वाचा -कोरोना दहशत : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांविरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल
कोरोना संशयीत रुग्णांना जे जे किंवा केईम रुग्णांवर तपासण करुनच पुढे कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. सध्या कोरोनाबाबत भीतीचे वातावरण असताना डॅाक्टर, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि इतर कर्मचारी सतत रुग्णालयाच्या सानिध्यात असतात. त्यांच्यावर उपचार करत असतात. अशावेळी ते मात्र धीर धरून कोरोनाशी मुकाबला करत आहेत.
कोरोना असो वा इतर कोणताही साथीचा आजार आम्हाला भीती वाटत नाही. कारण आम्ही या क्षेत्रात येतानाच भीती हा शब्द दूर करुनच येतो. रुग्णसेवा हीच आमच्यासाठी महत्त्वाची असते आणि हेच आमचे ध्येय आहे. कोरोनासारख्या कोणत्याही परिस्थितीचा धैर्याने लढा देण्यासाठी आम्हाला बळ देत असल्याचे जे जे रुग्णालयातील नर्स कविता ठोंबरे सांगतात. रुग्णालयात असताना आणि रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर काय काळजी घ्यायची हे आम्हाला माहित असते. तशी काळजी आम्ही घेतो आणि रुग्णांसह इतरांनाही घ्यायला लावतो असेही त्या सांगतात.
कोरोनाची भीती पाहता आमचे घरचेही आता आमची अधिक काळजी करु लागले आहेत. त्यांच्याकडून सातत्याने सुचना केल्या जात आहेत. आम्हाला काही होणार नाही ना, याची चिंता त्यांना असते. पण रुग्णसेवा हीच आमच्यासाठी महत्त्वाची असल्याने आम्ही स्वतची काळजी घेत आमचा रुग्णसेवेचा वसा पुढे नेत असल्याचे नर्स प्रतिभा पाठक यांनी सांगितले आहे.
नर्सेस, वॅार्डबॅाय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी रुग्णांच्या सतत सानिध्यात असतात. तेव्हा कोरोनासारख्या इतर आजारांची लागण होण्याची शक्यता आम्हाला अधिक असते. त्यामुळे आम्हाला आरोग्य विमा मिळावा अशी मागणी नर्सेस-वॅार्डबॅाय संघटनांकडून करण्यात आली आहे. तसे पत्रही नुकतेच संघटनेकडून सरकारला पाठवण्यात आले.
कोरोना आजार बरा होऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सरकारसह रुग्णालये, डॅाक्टर आणि आम्ही सर्व कर्मचारी कसोशीने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे स्वाईन फ्लूसारख्या इतर जीवघेण्या साथीच्या आजारातून आपण जसे बाहेर आलो. तसेच कोरोनावरही आपण मात करू, असा विश्वासही येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.