मुंबई :पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत बोलताना एक वक्तव्य केले होते. यासंदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात पुन्हा एकदा ट्विट केले. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा, असे ते म्हणाले. भाजपचे राज्यात सरकार असताना शिक्षण मंत्री विनोद तावडे होते. मुघलांचा इतिहासच पाठ्यपुस्तकातून काढण्याचा प्रयत्न त्यावेळी सुरू होता. मुघलांचा इतिहासच काढला तर छत्रपती शिवाजी महाराज काय गोट्या खेळत होते का? असे दाखवणार का? अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी त्या कार्यक्रमादरम्यान केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांकडून आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आहे.
आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडले:राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलत असतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळेच ते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. अशी वादग्रस्त वक्तव्ये करूनही उद्धव ठाकरे हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले आहेत.