मुंबई Jitendra Awhad Controversy : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी शिर्डी इथं पक्षाच्या शिबिरात भगवान श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं होतं. आव्हाडांच्या या वक्तव्याविरोधात अजित पवार गट तसंच भाजपा आक्रमक होत आहे. दुसरीकडं आव्हाड यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातूनच विरोध होत असल्याचं दिसतंय. जितेंद्र आव्हाड यांनी रामाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन उत्तर देत घरचा आहेर दिलाय. राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्मावर बोलणं सोडलं पाहिजे. देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना असल्याचंही रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
अजित पवार गट आक्रमक : आव्हाडांच्या त्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. जितेंद्र आव्हाडांच्याविरोधात ठाण्यात अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालाय. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर महाआरती करण्याचा प्रयत्न केला. महाआरती करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी अजित पवार गटाचे केवळ चार पदाधिकारी उपस्थित होते, असं ट्विट खुद्द जितेंद्र आव्हाड यांनीच केलंय. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आलीय. तसंच गुन्हा दाखल न झाल्यास ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात महाआरती करण्याचा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिलाय.