मुंबई - महाराष्ट्रात आता कोणत्याही पक्षाचे आमदार भाजपच्या आमिषाला बळी पडून फुटणार नाहीत. महाराष्ट्र हा भाजपसाठी आता खरेदी-विक्रीचा संघ नाही. ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी यापूर्वीच केली असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला.
'ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी यापूर्वीच केली, आता कोणीही फुटणार नाही' - गद्दारी करणारांनी यापूर्वीच केली - आव्हाड
महाराष्ट्र हा भाजपसाठी आता खरेदी-विक्रीचा संघ नाही. ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी यापूर्वीच केली असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला.
आव्हाड यांनी आज सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात भाजपकडून काही आमदारांना फोडले जाण्याचा प्रकार केला जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर आपण काय सांगाल? असे विचारले असता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.
आता कोणत्याही पक्षाच्या आमदारांचे गट फुटणार नाहीत. ५० कोटींचा डाव लावला तरी काही होणार नाही. सेना भाजपने त्यांची भूमिका ठरवली पाहिजे. यासाठी उशीर झाला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीती आव्हाडांनी व्यक्त केली. सध्या सेना आणि भाजप सत्तास्थापनेसाठी काय भूमिका घेतात हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वजण नेमकं काय घडेल हे पाहत आहेत. परंतू, जे काय होईल ते पुढच्या ५ दिवसात होईल. भाजपने शिवसेनेला अल्टिमेटम दिला असल्याची माहिती मिळाल्याचे आव्हाड म्हणाले. त्यामुळे या दोघांच्या निर्णयावर महाराष्ट्राची पुढची राजकीय भूमिका ठरणार आहे. राज्यात निर्णायक अवस्थेमध्ये कोणीच नसल्याचे आव्हाड म्हणाले.