मुंबई Mumbai Crime : अभिनेत्री नेहा पेंडसे यांचे पती शार्दुलसिंग पृथ्वीराज बायस हे वांद्रे पश्चिम येथे राहतात. त्यांच्या घरी चार नोकर काम करतात. सुमित कुमार सोलंकी (वय 28), जितू (वय 27), संजय (वय 35), ओमप्रकाश (वय 24) आणि महिला सुषमा (वय 26) या चार नोकरांची नावे आहेत. 28 डिसेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शार्दुलसिंग बायस यांचे चार वर्षांपूर्वी झालेल्या लग्नात त्यांना एक सोन्याचे हातात घालण्याचे कडे आणि एक सोन्याची हिरेजडीत अंगठी गिफ्ट मिळालेली होती. ज्वेलरी शार्दुलसिंग बायस हे नेहमी घराबाहेर जाताना परिधान करत असत आणि इतर वेळी ही ज्वेलरी घरात काम करणारे नोकर सुमित कुमार सोलंकी याच्याकडे देऊन बेडरूमच्या कपाटात ठेवण्यास सांगतात.
सहा लाखांचे दागिने केले लंपास : आरोपीकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळत आहे. एक सोन्याचे हातात घालण्याचे कडे साडेसहा तोळ्याचे असून त्याची किंमत तीन लाख 25 हजार इतकी आहे. सोन्याची हिरेजडीत अंगठी साडेपाच तोळ्याची असून त्याची किंमत दोन लाख 75 हजार इतकी आहे. असा एकूण सहा लाखांचे दागिने सुमित कुमार सोलंकी याने लंपास केला आहे.
अशी घडली घटना : सुमित कुमार सोलंकी हा शार्दुलसिंग बायस यांची सर्व कामे करतो आणि नेहमी त्यांच्या सोबतच राहतो. बाकी इतर नोकर देखील घरातच काम करून 24 तास त्याच ठिकाणी राहतात. त्यातील एक नोकर ओम प्रकाश हाच फक्त काम करून त्याच्या घरी जातो. 28 डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास बायस हे घरी आराम करत होते. काही वेळाने बायस हे तयार होऊन बाहेर जाण्यासाठी निघाले असताना त्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, हातात घालण्याचे कडे आणि सोन्याची अंगठी घेण्यासाठी गेले असता त्यांना ती ज्वेलरी कपाटात सापडली नाही. त्यावेळी त्यांनी घरातील सर्व नोकरांकडे याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचं कळलं. त्याचवेळी त्यांना इतर नोकरांकडून समजलं की, सुमित कुमार हा गैरहजर असून तो त्याच्या आत्याच्या घरी गेला आहे.
सुमित कुमार सोलंकीच्या आवळल्या मुसक्या : बायस यांनी सुमित कुमारला कॉल केला असता त्याने तो कुलाबा येथे असल्याचं सांगितलं. त्याला ज्वेलरीबाबत विचारणा केली असता त्याने बेडरूम मधील कपाटातच ज्वेलरी ठेवली असल्याचं सांगितलं. त्यानंतर कपाटात तसेच घरातील इतर ठिकाणी शार्दुलसिंग बायस यांनी हरवलेला ज्वेलरीचा शोध घेतला असता त्यांना ती सापडली नाही. त्यानंतर पुन्हा शार्दुलसिंग बायस यांनी सुमित कुमाला मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता, तो मोबाईल रिसीव करण्यासाठी टाळाटाळ करू लागला. त्यानंतर शार्दुलसिंग बायस यांना खात्री पटली की, सुमित कुमार यानेच ही चोरी केली असावी. मात्र बायस यांची तब्येत ठीक नसल्यानं त्यांच्या वतीनं त्यांच्या वाहन चालक रत्नेश झा यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी सुमित कुमार सोलंकी याच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -
- फोटो काढायला गेली अन् अवघ्या दोन सेकंदात दागिन्यांची पर्स लंपास, वऱ्हाडी बनून आलेल्या चोराचा प्रताप
- दागिन्यांची बॅग चोरी प्रकरणात ओडिसातून चोरट्याला मुद्देमालासह अटक, नांदेड पोलिसांनी 'अशी' केली दमदार कामगिरी
- तामिळनाडूतले चोरटे मारत होते पिंपरी-चिंचवडमधील मोबाईलवर डल्ला; 60 मोबाईल, 14 लॅपटॉप जप्त