मुंबई- शहरात मेट्रोसाठी नेमण्यात आलेल्या जपानी सल्लागार कंपनीची पर्यावरण जपण्याबाबत पॉलिसी आहे. या पॉलिसीची कंपनीकडून जपानमध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जाते. मात्र मुंबईत आरेमध्ये कारशेड उभारताना या पॉलिसीचा कंपनीला विसर पडतो. जायका कंपनीच्या या दुटप्पी भूमिकेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान तसेच मुंबईमधील राजदूत यांना पत्र लिहिले असल्याची माहिती, पालिकेतील माजी नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांनी दिली आहे.
अवकाश जाधव हे सेंट झेवियर्सचे प्राध्यापक आहेत. ते पालिकेचे माजी नामनिर्देशित नगरसेवक होते. त्यांच्या ‘काश फाउंडेशन’ च्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने एक सर्व्हे करण्यात आला. त्याची माहिती देताना जायका कंपनीच्या पर्यावरण पॉलिसीत वृक्षांची जोपासना करून पर्यावरणाला धोका पोहचू नये म्हणून काम करण्याचे म्हटले आहे. या पॉलिसीची कंपनीने जपानमध्ये योग्य अंमलबजावणी केली आहे. मात्र भारतात कंपनी आपली पर्यावरण पॉलिसी विसरली असल्याची टिका जाधव यांनी केली.