मुंबई :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी मुलगी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांची निवड केली आहे. मात्र अजित पवार यांना डावलल्यामुळे या निवडीवर चांगलीच टीका होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार यांच्यावर कोणताही अन्याय करण्यात आला नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे राष्ट्रवादीत घराणेशाहीला थारा नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीत मोठा उत्साह :राष्ट्रवादी पक्षाचा आज 25 वा वर्धापण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनाच्या दिवशीच शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ला पटेल यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली. नव्या लोकांकडे जबाबदारी आल्याने पक्षात मोठा उत्साह असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
अजित पवारांवर अन्याय नाही :अजित पवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते ही मोठी जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्यावर कोणताही अन्याय पक्षाने केला नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांना डावलण्यात आल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी जयंत पाटील यांना विचारले होते.