मुंबई - काठीला तेल लावून पोलीस कारवाई करणार, हे प्रतिकात्मक वक्तव्य होते. पोलिसांना नागरिकांशी पालकाच्या भूमिकेत वागण्याचे आदेश दिले आहेत, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. तर, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात महाराष्ट्राने अत्यंत सक्षमपणे नागरिकांना अत्यावश्यक सेवा देऊन संचारबंदी यशस्वी केली आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
पोलिसांना नागरिकांशी सौजन्याने वागण्याचे आदेश सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत मास्क आणि सॅनिटायझर पाठवण्यात आले. यावेळी दोघांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
हेही वाचा -CORONA : या संकटातून जगू की वाचू..? ठाऊक नाही.. असंघटित मजुरांची गावाकडे पायपीट
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या निर्देशाप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. सुरुवातीच्या काळात पोलिसांना नागरिकांवर कठोर कारवाई करावी लागली. मात्र, त्यानंतर पोलिसांना सौजन्याने वागण्याचे आदेश दिले असल्याचे देशमुखांनी सांगितले. आपला मुलगा चुकीचा वागला तर पालक त्याला ज्या पद्धतीने शिक्षा देतात किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याच पद्धतीचे पोलिसांचे वर्तन होते. याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला, असेही देशमुख म्हणाले.
इस्लामपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी उपाययोजना करण्यत येत आहेत. त्यासाठीच डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवकांना सुरक्षितता मिळावी यासाठी मुंबईतून आवश्यक ती साधनसाम्रगी पाठवण्यात आल्याचे, जयंत पाटील यांनी सांगितले.