मुंबई : Jayant Patil On Ramesh Kadam : मंत्री छगन भुजबळ कारागृहात असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश कदम यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकारण चांगलचं तापलं आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रमेश कदम कशाच्या आधारे आरोप करतात, माहित नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याप्रकरणी आता राजकारण रंगत असून आरोपप्रत्यारोप होत आहेत.
तुरुंगात दोघांची चर्चा झाली असेल :रमेश कदम कशाच्या आधारे बोलतात, मला माहित नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. तुरुंगात असतांना त्या काळात दोघांची चर्चा झाली असेल, तर ती मला माहीत नाही. चुकीच्या पद्धतीचा शरद पवार दबाव स्वीकारतात असं, मला वाटत नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. काही आवश्यक असेल तर त्या गोष्टी ते करतात. छगन भुजबळ आमेच सर्वांचे सहकारी होते. ते तुरुंगातून बाहेर यावे, यासाठी सतत त्यांचं कुटुंब आणि आम्हा सर्वांचे प्रयत्न कायम होते. छगन भुजबळ तुरुंगात असताना देखील खासदार सुप्रिया सुळे या त्यांची भेट घेत होत्या. त्यांची लवकरात लवकर तुरुंगातून सुटका व्हावी, हा सगळ्यांचा उद्देश होता, असंही जयंत पाटील यांनी यावेली सांगितलं.
पाणीटंचाई दूर करावी, बाप्पाकडं साकडं :परतीच्या पावसानं पाणीटंचाई दूर करावी, असं बाप्पाकडं साकड घातल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाकडं सर्वांनी प्रार्थना केली होती. देशातील दुष्काळाचं सावट काही अंशी कमी व्हावं. गेल्या दहा दिवसात राज्यातील पुणे, मुंबई आणि राज्यातील ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याचा साठा सुधारला आहे. जुलैपर्यंत आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसानं पाणीटंचाईचं संकट दूर करावं, महागाईचं संकट दूर करून देश प्रगतीपथावर न्यावा, तसेच महाराष्ट्र राज्याला अधिक सुबद्धता यावी, अशी मागणी गणपती बाप्पाकडं केली असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.