मुंबई - कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कोरेगाव-भीमा, शेतकरी कर्जमाफी, बुलेट ट्रेन आदी मुद्यांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. कोरेगाव-भीमा दंगलीतील आरोपींवर असलेले गुन्हे मागे घेण्याविषयी स्पष्ट भूमिका घेण्याचे त्यांनी टाळले.
आमचं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही
कोणते गुन्हे गंभीर आहेत, कोणत्या गुन्ह्यांमध्ये जाणिवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले याची माहिती घेतली जाईल. सगळ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जाईल, असे विधान जयंत पाटलांनी कोरेगाव-भीमा प्रकरणी केले. कोरेगाव-भीमा परिषदेनंतर पेटलेल्या दंगलीत अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरे आंदोलकांचे गुन्हा मागे घेतल्यानंतर हेही गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी होत आहे.
संभाजी भिडे हे कोरेगाव-भीमा दंगलीचे प्रमुख आरोपी आहेत. पण, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यासंबंधी जयंत पाटलांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे गुन्हेगार आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल असे ते म्हणाले. गैरसमज न पसरवण्याचे आवाहन त्यांनी केले.
साखर कारख्यान्यांच्या मदतीबाबत
साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मदतीविषयी पाटील म्हणाले, की आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे मदत देण्यासाठी समान धोरण राबवू. आम्ही पक्ष बघून निर्णय घेणार नाही. ज्याला आवश्यक असेल त्याला रिव्ह्यू करून मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना मदत करणे आमचे प्राधान्य आहे.