मुंबई - देवेंद्र फडणवीस म्हणतात, आम्हाला विचारले जात नाही, म्हणून आम्ही राज्यपालांना भेटतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फडणवीसांनी इतके वर्षे काम केले. आता मात्र मुख्यमंत्र्यांचा फोन नंबर ते विसरलेत का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. काही सुचना असतील तर मन मोठे करून मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त व्हा, असा सल्लाही पाटील यांनी फडणवीसांना दिला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संपूर्ण जगच कोरोना आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हतबल झाले आहे. अशा परिस्थितीतही भाजपाचे लोक राज्य सरकारला प्रश्न विचारत आहेत. असे असेल तर आम्हीही विचारू शकतो, देशात कोरोना आला कसा? कोरोना आला तेव्हा पंतप्रधान ट्रम्प यांच्या स्वागतात व्यस्त होते. मात्र, संकटाची परिस्थिती असताना आम्ही असे म्हटले नाही. भाजपला सत्तेशिवाय काहीच दिसत नाही म्हणून ते संकटकाळातही राजकारण करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.