मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. कार्यालयात दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. सांगली-मिरजमध्ये राष्ट्रावादीचे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केले आहे. ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पक्षाचे कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजपाविरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. ईडीने जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलवल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते हे संतप्त झाले आहेत. ईडी आणि कार्यालयाबाहेर आणि पाटील यांच्या घराबाहेर समर्थकांनी गर्दी केली आहे. दरम्यान चौकशीला जाण्याआधीच जयंत पाटील यांनी ट्विट केले.या ट्विटमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मुंबईला न येण्याचे आवाहन केले.
माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे - जयंत पाटील
कार्यकर्ते मुंबईत दाखल, ईडीविरोधात घोषणाबाजी : जयंत पाटील यांच्या या आवाहनानंतर समर्थकांनी मुंबईचा रस्ता धरला. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले आहेत. ईडीच्या कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधातही या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ईडी आणि भाजपाविरोधात जोरात घोषणाबाजी केली जात आहे. तर ईडीकडून सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. ईडी भाजपच्या घरगडी प्रमाणे काम करत असल्याचा आरोपही अनेकांनी केला.