मुंबई : नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसन आक्रमकपणे मैदानात उतरल्याच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी ४ फेब्रुवारीला 'एक तास पक्षासाठी', ही संकल्पना राबवली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना हा उपक्रम राज्यभरात राबवा, असे आवाहन केले आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या.
पक्षासाठी ही चळवळ : राष्ट्रवादी काँग्रेसने एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही चळवळ सुरू केली आहे. 1 जानेवारी 2022 पासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राज्यभरात हा उपक्रम राबवला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून ही संकल्पना पुढे आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हा उपक्रम राज्यभर राबवत आहेत. येत्या शनिवारी ४ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचा 'एक तास पक्षासाठी, हा उपक्रम राबवला जाणार आहे.
नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवणार : या उपक्रमांतर्गत शहरातील पदाधिकाऱ्यांची टीम प्रभागात पोहोचून, स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने नागरिकांचे प्रश्न समस्या सोडवत आहेत. दरम्यान, पक्षाची ध्येय, धोरणे पटवून दिली जात आहेत. तसेच राष्ट्रवादी हा पक्ष नसून एक कुटुंब असल्याची भावना जनतेच्या मनात रुजवली जात आहे. नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळत आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये या उपक्रमामुळे विचारांची देवाण-घेवाण होते आहे. या उपक्रमामुळे संवाद वाढल्याने सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधीलकी आणि नाळ घट्ट होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे.
व्यापक दृष्टिकोनातून पक्षाला बळकटी : एक तास पक्षासाठी हा उपक्रम व्यापक दृष्टिकोनातून पक्षाला बळकटी देणार आहे. एकेक नागरिक यामुळे राष्ट्रवादीशी जोडला जातो आहे. पक्षाची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे शिक्षण, शेतकरी वर्ग, उद्योगधंदे आणि बेरोजगारीचे प्रमाण कसे वाढत आहे, या उपक्रमातून जनजागृती केली जात आहे. नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. बजेटमध्ये केंद्राने राज्याला कशाप्रकारे डावलले, हे सर्वसामान्य जनतेला पटवून सांगितले जाणार आहे. तसेच सध्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक माध्यमातून सातत्याने होणाऱ्या जातियवादी विचारांच्या प्रसाराऐवजी एक प्रगल्भ नवी पिढी घडवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एक - दोन तास पक्षासाठी देणे आवश्यक आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा :MLC Election Result : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा डंका, ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी