मुंबईBuddha Vihara in Mumbai :जपानी निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी १९३१-३८ दरम्यान भारतात आले असता भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी वरळी येथे टेकडीखाली बुद्ध विहार (Buddha Vihara) बांधलं. सन १९५० च्या दरम्यान याच्या नूतनीकरणाचं काम सुरू झालं आणि दोन वर्षात पूर्ण झाले होते. नवीन आकर्षक चैत्यगृहासारखे बुद्ध विहार बांधण्या आले होते. त्यावेळी उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांनी मदत केली होती. या विहाराच्या नूतनीकरणाचं काम चालू असताना स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी येथे भेट दिली होती. तसंच त्यांनी येथे सभा देखील घेतली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्धविहार : सन १९५० च्या दरम्यान भारतीय संविधानाचं काम पूर्ण होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिलाच्या मागे लागले होते. २ जानेवारी १९५० रोजी ते दिल्लीवरून मुंबईस परतले होते. त्यावेळी विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबई प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता. २९ जानेवारी १९५० रोजी महाराष्ट्र मंडळ आणि इतर मराठी संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर १४ एप्रिल १९५० रोजी त्यांचा जन्मदिवस सर्व भारतभर साजरा करण्यात आला होता. २५ मे १९५० रोजी ते विमानाने कोलंबो (सिलोन) येथे गेले होते. तिथे त्यांनी भारतातील बौद्धधर्म या विषयावर भाषण दिलं होतं. तिथून येताना त्रिवेंद्रम आणि मद्रास येथे त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर दिनांक २९ सप्टेंबर १९५० रोजी त्यांनी वरळी येथील बुद्ध विहारात भाषण दिलं आणि लोकांना बौद्धधर्म स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. तसंच बौद्ध धर्माच्या पुनरुत्थनासाठी आणि प्रसारासाठी यापुढील आयुष्य व्यतीत करीन असं त्यांनी जाहीर केलं होतं. ते हेच बुद्ध विहार आहे, जे नूतनीकरणानंतर जपानी बुद्ध विहार म्हणून प्रसिद्ध झालं आहे.