मुंबई Jalna Maratha Protest Lathicharge : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर (Maratha Protest Jalna Lathicharge) लाठीचार्ज झाल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी (SP Tushar Doshi Transfer) यांच्यावर कारवाई करण्यात येऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून, त्यांना पुणे जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आलंय.
मंत्री दीपक केसरकर यांचं पत्र दीपक केसरकरांचं पत्र : वास्तविक ही क्रीम पोस्ट असून दोशी यांना गृह विभागानं कारवाई केली आहे की बढती दिली आहे? असा सवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून तुषार दोशी यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे. यामुळं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचं चित्र निर्माण झालंय.
जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न : या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 'एक्स'द्वारे पोस्ट करत जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात, अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानूष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले? हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही. त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. लाठीमारानंतर जालनाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र, कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात 'क्रिम पोस्ट'वर बदली मिळाली. मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्यानं नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन? अशी चर्चा सुरू असताना आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या, अशी मागणी करत आहेत.
विरोधी पक्षाची राज्य सरकारवर टीका : विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कामकाजाबाबतची माहिती पत्रांवर पत्रे लिहिल्यानंतर मिळत नाही, केसरकरांचे हे पत्र मात्र लगेच सार्वजनिक होते. हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्याने रडल्यासारखे करायचे, असाच आहे. महायुतीचे सरकार हे जनतेला मूर्ख बनवू पाहणारे हेराफेरी सरकार आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
हेही वाचा -
- मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरण; सक्तीच्या रजेवरील तुषार दोषींची पुण्यात बदली
- लाठीचार्ज प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर मोठी कारवाई, आंदोलक मनोज जरांगे यांनी 'ही' केली मागणी
- Jalna Maratha Protest : मंत्रालयातून आलेला 'तो' अदृश्य फोन कोणाचा? 'लाठीचार्ज'वरुन संजय राऊतांचा सवाल