अॅड. सुरेंद्र लांडगे, आरोपी चेतन सिंहचे वकील मुंबई : जयपूर - मुंबई सुपर फास्ट एक्सप्रेसमध्ये चार जणांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या चेतन सिंहच्या पोलीस कोठडीत 11 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी त्याला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले. या रिमांडमध्ये त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमांमध्ये आणखी चार कलमांची वाढ करण्यात आली. आता चेतन सिंहवर कलम 153 (अ), 363, 341 आणि 342 लावण्यात आले आहेत.
कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात आणले : चेतन सिंहला कडक सुरक्षा व्यवस्थेत बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले. हे प्रकरण धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असल्याने आरोपीला चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. चेतन सिंहला न्यायालयात आणत असताना पोलिसांच्या कारला एकूण 3 रॉयट कंट्रोल गाड्या एस्कॉर्ट करत होत्या. तीनही वाहनांमध्ये सुमारे 45 जवान होते. आरोपीचे मोठे भाऊ आणि पत्नी मुंबईत आले आहेत. सध्या ते आरपीएफच्या देखरेखीखाली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 125 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
गोळीबारानंतर पहिला कॉल पत्नीला केला : जयपूर - मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून चौघांचा बळी घेणाऱ्या चेतन सिंहने घटनेनंतर पहिला कॉल पत्नी रेणू सिंहला केला होता. 'जे व्हायचे ते झाले, आता तू मुलांची काळजी घे. त्यांचा नीट सांभाळ कर', असे चेतनने पत्नीला सांगितले होते. या संभाषणानंतर, दहिसर ते मीरा रोड स्थानकांदरम्यान गाडी थांबल्यानंतर तो गाडीतून खाली उतरला आणि मीरा रोड स्थानकाच्या दिशेने पळाला. पोलीस तपासात या बाबींचा उलगडा झाला आहे.
कुटुंबीयांचे जबाब नोंदवले : लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि एटीएएस या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहेत. या प्रकरणी चेतन सिंह याची पत्नी आणि आईचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. चेतनचा स्वभाव कसा आहे?, त्याला कुठला आजार आहे का?, तो काय वाचत होता? असे प्रश्न पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना विचारले. पत्नी रेणू सिंह हिने चेतन सिंहच्या मानसिक आजारासंदर्भातील माहिती आणि संबंधित कागदपत्रे तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली आहेत. पोलीस तपासात चेतनने कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा वारंवार व्यक्त केली होती.
हेही वाचा :
- Firing In Mumbai Jaipur Express : 'तो मानसिकदृष्ट्या आजारी होता, अधिकारी छळ करायचे';जवानाच्या कुटुंबियांचे धक्कादायक खुलासे
- Jaipur Mumbai Train firing : आरोपी आरपीएफ जवानाला आज तीन वाजता न्यायालयात करण्यात येणार हजर, गोळीबाराचे काय आहे प्रकरण?
- Mumbai News: 'हा' त्रास होत असल्याने, थांबा नसताना देखील चेतनला वलसाडला उतरायचे होते