महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमेरिकेचे जे. लुईस कोरीया यांनी घेतली मुंबईच्या कोविड प्रतिबंधात्मक कामगिरीची दखल

मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटांदरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. याची दखल संयुक्त अमेरिकेच्या (United States of America) सभागृहचे प्रतिनिधी सदस्य अर्थात ‘काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज्’ चे सदस्य जे. लुईस कोरीया यांनी घेतली आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

By

Published : Jul 7, 2021, 9:05 PM IST

मुंबई- मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटांदरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. याची दखल न्यायालय, विविध राज्यांनी घेतली आहे. परदेशातील अनेक संस्थांनीही या कामाची दखल घेतली आहे. मुंबईसारख्या शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यात केलेल्या कामाची दखल संयुक्त अमेरिकेच्या (United States of America) सभागृहचे प्रतिनिधी सदस्य अर्थात ‘काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज्’ चे सदस्य जे. लुईस कोरीया यांनी घेतली आहे. कोरीया यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आवर्जून पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आयुक्तांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले आहे.

जे. लुईस कोरीया यांनी पाठवलेले पत्र

आयुक्तांना पत्र

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च, 2020 मध्ये आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्त्वात बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने कोरोना प्रतिबंध व उपचार करत आहे. महापालिकेद्वारे अविरतपणे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची दखल देशातील व जगातील अनेक संस्थांनी आजवर घेतली असून यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य विभाग, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, नीति आयोग इत्यादी मान्यवर संस्थांचा समावेश आहे. याच शृंखलेत आता संयुक्त अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाचे सदस्य अर्थात ‘काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज्’ चे सदस्य जे. लुईस कोरीया यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून महापालिकेच्या कामगिरीचे दखल घेतली आहे. त्यांनी पालिकेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

आयुक्तांच्या संघटन कौशल्याचे कौतुक

जे. लुईस कोरीया यांनी महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड साथरोगाच्या कालावधी दरम्यान केलेली कामे कौतुकास्पद असल्याचे नमूद केले आहे. तसेच या अंतर्गत प्रामुख्याने विभागस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्याद्वारे गरजू रुग्णांना रुग्ण शय्यांचे वितरण संगणकीय प्रणालीद्वारे करणे, प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार व संसर्गाच्या प्रभावानुसार रुग्णालयात दाखल करुन उपचार करणे, गरजू रुग्णांना योग्यप्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे इत्यादी बाबींचा कोरीया यांनी त्यांच्या पत्रात उल्लेख केला आहे. महापालिकेने राबविलेले प्रतिबंधात्मक उपाययोजना व केलेल्या उपचारामुळे एप्रिल महिन्यात जवळजवळ 30 टक्के इतका असणारा बाधित होण्याचा दर आता 4 टक्क्यांवर आला आहे. ही बाब नमूद करत कोरीया यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविधस्तरीय बाबी या व्यवस्थापन कौशल्याचे अती उकृष्ट उदाहरण असल्याचेही नमूद केले असून महापालिका आयुक्तांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले आहे. तसेच चहल यांचे कार्य हे प्रशासकीय सेवेतील कनिष्ठ सहकाऱ्यांसाठी अनुकरणीय असल्याचेही कोरीया यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

हेही वाचा -शिंदे ते सिंधिया, वक्तृत्वाच्या जोरावर छाप पाडणाऱ्या मराठमोळ्या ज्योतिरादित्य यांची जाणून घ्या राजकीय कारकीर्द

ABOUT THE AUTHOR

...view details