मुंबई :दक्षिण मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या 3 मुलींना शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीने नूडल्स आणि खाण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी बोलावले. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडित मुली या बहिणी आहेत. अल्पवयीन मुलींनी घडलेल्या प्रकाराबद्दल आईला सांगितल्यावर तिला मोठा धक्का बसला. त्यांनतर तिने जे जे मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर जे जे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित मुलींच्या आईच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खाण्यापिण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार :या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 376, 367 (ब), 341, 377 आणि पॉक्सो कलम 4, 5 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तीन मुलींना नूडल्स आणि खाण्यापिण्याचे आमिष दाखवून आरोपीने आपल्या घरी बोलावून दरवाजा बंद करून घेतला. जेणेकरून या मुली घरातून पळून जाऊ नये. त्यानंतर या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. घरी आल्यानंतर घडलेला प्रकार पीडित मुलींनी आईला सांगितला, असे पीडित मुलींच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.