मुंबई:अज्ञात व्यक्ती बॉम्बस्फोट करणार असल्याची माहिती प्राप्त होताच त्याबाबत दक्षिण नियंत्रण कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनुप डांगे तसेच अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, दिलीप सावंत यांना तात्काळ माहिती देण्यात आली. मुंबई शहर हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याने अपर पोलीस आयुक्त यांनी या संवेदनशील माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दक्षिण प्रादेशिक विभागांतर्गत सर्व बंदर परिसर, लॅन्डिंग पॉईटस, मर्मस्थळे, संवेदनशील आणि गर्दीची ठिकाणे इत्यादी ठिकाणी सुरक्षा आणि सतर्कता पाळण्याचे आदेश दिले. या माहितीची अत्यंत गोपनीयपणे शहानिशा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
या पथकाने घेतली मेहनत:अपर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार दक्षिण प्रादेशिक विभागांतर्गत सर्व बंदर परिसर, लॅन्डींग पॉईंटस, मर्मस्थळे, संवेदनशील आणि गर्दीची ठिकाणे इत्यादी ठिकाणी या माहितीच्या अनुषंगाने शोध घेण्यात आला. मात्र काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाहीत आणि उपरोक्त नमूद कॉलरने खोटी माहिती दिली असल्याचे निष्पन्न झाले. अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जे. जे. मार्ग पो. ठाणे सुभाष बोराटे, प्रभारी पोलीस निरीक्षक, दक्षिण नियंत्रण कक्ष, अनुप डांगे, महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली कदम आणि जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मुरदारे, पोलीस हवालदार नालंदा लोखंडे, सचिन पाटील, पोलीस शिपाई शशिकांत जाधव, संदीप भोळे ह्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास केला. अखेर दक्षिण नियंत्रण कक्षास खोटी माहिती देणारा नागपूरचा रहिवासी असलेल्या आरोपीस डहाणू, जिल्हा-पालघर याठिकाणाहून अवघ्या १० तासांच्या आत ताब्यात घेतले. या आरोपी विरुध्द सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही मिळाल्या धमक्या: मुंबई शहरातील काही भागात बॉम्बस्फोट करण्याची धमकी यापूर्वीही मिळाली आहे. 19 ऑक्टोबर, 2022 रोजी अज्ञात व्यक्तीकडून फोन करुन, तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलीस धमकीचा फोन करणाऱ्याचा कसून शोध घेत होती. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती.