मुंबई- मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून पालिकेकडून पिंजाळ आणि गारगाई प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, गारगाई प्रकल्पाचे काम अर्ध्यापर्यंत झालेले आहे. तर, पिंजाळ प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण होऊ शकत नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा आज महापौरांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना महापौरांनी सदर माहिती दिली.
स्वच्छ सुरक्षित मुंबई आणि चांगले रस्ते याचा संकल्प नवीन वर्षात केला आहे. या संकल्पानुसार शहरात काय करता येईल याबाबत आढावा घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालिकेचे सुरू असलेले अर्धवट असलेले तसेच पुढे होऊ घातलेल्या प्रकल्पांची माहिती घेतल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणे बांधली जात आहेत. त्यापैकी गारगाई धरणाचे काम अर्ध्यापर्यंत झाले. तर, पिंजाळ प्रकल्पासाठी ग्राम पंचायत स्तरावर ठराव घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले.
वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील सोयी-सुविधांवर ताण येतो. महापालिका अशा परिस्थितीत सेवा पुरवते. निर्जन स्थळी मुली-महिलांसोबत छेडछाड, वयोवृध्दांची लूटमार होत असल्याची तक्रार येते. बंद मिल किंवा निर्जन ठिकाणी गैरप्रकार होत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी निर्जन स्थळ खूली केली जातील. मिलच्या बंद जागांवरही मालकांच्या संमतीने देखरेख ठेवण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रासायनिक आणि ज्वलनशील पदार्थांचा वापर करणाऱ्या कारखान्यांची माहिती सादर करावी, असे निर्देश महापौर पेडणेकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. भरवस्तीतून असे कारखाने हद्दपार करावेत, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.
तीन महिन्यांनी आढावा बैठक