मुंबई -मुंबई महानगरात सुशोभीकरण, विकास कामे झपाट्याने सुरू आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण, नाला रुंदीकरण, नवीन पूल उभारणी या कामांसाठी अनेक झोपडीधारक दुकानदार गोदाम मालक बाधित होत असतात त्यांना मूळ जागेवरून हटवून नवीन पर्याय देणे पालिकेसाठी बंधनकारक आहे. अशा अनेक बाबी सुरू असल्याने सुमारे 35 हजार नागरिक प्रकल्प बाधित होण्याची शक्यता आहे. या 35 हजार नागरिकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी महापालिकेने मुंबई शहर, उपनगरात सहा विभागांमध्ये ही पर्यायी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
विकासकांचा थंड प्रतिसाद -मुंबई शहर, उपनगरात सुमारे सहा विभागांमध्ये घरांची निर्मिती करण्यासाठी महानगरपालिकेने निविदा जाहीर केले आहे. मात्र, विकासाकांना या निविदानमधून कमी मिळत असल्याने महापालिकेच्या या निविदांकडे विकासकांनी चक्क पाठ फिरवली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आधी तीन वेळा काढलेल्या निविदांना प्रतिसाद न आल्याने आता चौथ्यांदा याबाबतची निविदा जाहीर करण्यात येत आहे. या निविदेला तरी विकासकांचा प्रतिसाद मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रकल्प बाधितांसाठी सध्या मुंबई महानगरपालिका 300 चौरस फुटांच्या सुमारे 13 हजार 871 घरांची निर्मिती करीत आहे.