राज्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील मुंबईIssue Of Malnourished Children:राज्यातील बालकांचा कुपोषणाचा प्रश्न अतिशय तीव्र झाला असून सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे सभागृहाचे कामकाज बाजूला सारून या विषयावर स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील बालकांची आरोग्य तपासणी केली असता ७८ हजार १८८ बालके कुपोषित आढळून आली आहेत. यातील ७० हजार बालके मध्यम कुपोषित आणि ९ हजार १८९ बालके तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. ७० हजार बालके असूनही तीव्र कुपोषणाच्या क्षेत्रात नसल्यामुळे ते उपचारापासून वंचित आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत २ हजार ४०३ बालमृत्यू झालेले आहेत, असा आरोप पाटील यांनी यावेळी केला.
कुपोषित बालकांवरील उपचारात अडचणी:अमरावती जिल्ह्यातील मेळघाट तसेच नंदुरबार, बीड, नाशिक व अहमदनगर याठिकाणी तीव्र कुपोषित मुलांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नाहीत, स्त्रीरोग तज्ज्ञ नाहीत. आहार तज्ज्ञ यांची बरीच पदे रिक्त आहेत. कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. म्हणून बालमृत्यू रोखण्यात सरकारला अपयश आलेले आहे. सरकारने या कुपोषणावर आणि बाल मृत्यूंवर पुढच्या आठवड्यात निवेदन करावे, अशी विनंती पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना केली. सरकारने या प्रश्नावर निवेदन करावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले.
ठाणे जिल्ह्यात कुपोषणाची समस्या तीव्र: कुपोषणाच्या अहवालानुसार २०२१-२२ या वर्षांतील ठाणे जिल्ह्यात १२२ बालके तीव्र कुपोषित, तर १ हजार ५३१ बालके मध्यम कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कुपोषित बालकांची ठाणे जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक संख्या एकट्या शहापूर तालुक्यात असल्याचे उघडकीस आले असून ७९५ बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.
कुपोषणाची समस्या अजूनही गंभीर: ० ते ५ वर्ष वयोगातील तीव्र कुपोषित (सॅम) बालके मध्यम कुपोषित (मॅम) गटात आल्यावर त्यांना पोषण आहार आणि औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मॅम गटातील बालक पुन्हा सॅम गटात जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषतः शहापूर, भिवंडी, मुरबाड तालुक्यात कुपोषणाची समस्या अजूनही गंभीर रूप धारण करत असल्याने यावर तातडीने राज्य सरकारने लक्ष देऊन कुपोषणामुळे होणाऱ्या बालकांचे बळी जाऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपसून श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी प्रमोद पवार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून करीत आहेत.
हेही वाचा:
- रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा विधानभवनावर धडकणार, शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप
- महाराष्ट्रात कॅसिनोला पूर्णतः बंदी, कॅसिनो निरसन विधेयक विधानपरिषदेतही एकमताने मंजूर
- एकच कुटुंब असणारे गाव! मेळघाटातील घनदाट जंगलात पिली गावात एकच घर, पाहा व्हिडिओ