मुंबई : Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप सुरू आहे. हमासनं अतिशय क्रूरपणे भीषण असा शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर तिथले जनजीवन तर विस्कळीत झालेच मात्र, घराघरात देखील शोककळा पसरली आहे. मुंबईत पंधरा वर्षे उमरखाडी परिसरात आणि 1969 ला इस्रायलला स्थलांतरित झालेले अव्राहम नागावकर (Avraham Nagaonkar) यांनी या युद्धजन्य परिस्थितीबाबत खेद व्यक्त परत तेथील दाहकता सांगितली (Avraham Nagaonkar On Israel Hamas War)आहे. आम्हाला येथे कोणालाच अन्न गोड लागत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हमासनं हल्ला केल्यानंतर तिथं काय घडलं याबाबतचा अनुभव अव्राहम नागावकर यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत शेयर केला.
सावधान राहण्यासाठी दिला सायरन : गाजा पट्टी परिसरात 22 गावे आहेत. या गावांमध्ये दहशतवादी घुसले. शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी आम्हाला सायरन देण्यात आला होता. आतापर्यंत दोनवेळा सायरन देण्यात आला होता. आपत्कालीन काळादरम्यान इस्रायलमध्ये स्वतःच्या बचावासाठी आणि सावधान राहण्यासाठी प्रत्येक घराला समजेल असा सायरन दिला जातो. सायरन दिल्यानंतर घरातील प्रत्येकानं बंकरमध्ये जाऊन लपायचं असतं. इस्रायलमध्ये प्रत्येकाच्या घरात देखील बंकर बनवून घेणं सरकारनं बंधनकारक केलंय. सायरन झाल्यानंतर बहुतांश लोक बंकरमध्ये लपतात. मात्र, सुदैवाने युद्धाची झळ आमच्या शहरापर्यंत पोहोचली नाही. डिमोरा शहरात मी राहत असून, डिमोरा शहर गाजा पट्टीपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे, असं अव्राहम नागावकर यांनी सांगितलं.
इस्रायलमध्ये होता 'शब्बत' सण : पुढे त्यांनी सांगितलं की, मी पंधरा वर्षे मुंबईतील उमरखाडी परिसरात राहत होतो. माझे शालेय शिक्षण माझगावमधील ज्यू शाळेत झालं. त्यानंतर 1969 पासून मी माझ्या कुटुंबासह इस्रायलला स्थलांतरित झालो. माझ्या कुटुंबात माझी पत्नी, मुलगी आणि मुलगा, जावई असे सदस्य आहेत. अव्राहम पुढे म्हणाले, डिमोरा शहरात जिथं आम्ही राहतो, तिथं जवळपास 30 हजारांची लोकसंख्या आहे. येथे दर शुक्रवारी 'शब्बत' हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी शनिवारपर्यंत 24 तास हा सण सुरू असतो. या 24 तासांच्या कालावधीत आम्हाला जेवण करायचं नाही, गाडी चालवायची नाही आणि गरज असेल तरच घराबाहेर पडायचं. थोडक्यात काहीच काम करायचं नाही. शिजवून ठेवलेलं जेवण फक्त गरम करून खायचं. जेवन शिजवायचं नाही. धार्मिक ग्रंथांचं पठण करायाचं असतं.
दहशतवादी घुसले संगीताच्या कार्यक्रमात : सहा तारखेला शुक्रवार होता आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरला सणाचा दिवस होता. त्यामुळे बरीचशी माणसं शनिवारी घरातच होती. मात्र, काही तरुण मुलांनी गाजा पट्टीपासून काही अंतरावरच असलेल्या एका मोकळ्या जागेत संगीताचा कार्यक्रम ठेवला होता. शुक्रवारी रात्री सुरू झालेला हा कार्यक्रम पहाटेपर्यंत ठेवण्यात आला. त्यामुळे गाजा पट्टीतून घुसलेले दहशतवादी थेट या संगीताच्या कार्यक्रमात घुसले आणि तेथे त्यांनी जवळपास 400 जणांना संपवलं असल्याचं नागावकर यांनी सांगितलं.