मुंबई : दहशतवादाला प्रोत्साहन देणे व मनी लॉन्ड्रींग यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला इस्लामिक उपदेश डॉ. झाकीर नाईकला ताब्यात घेण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्याची माहिती आहे. 2017 मध्ये भारत सोडून फरार झालेला झाकीर नाईक एका धार्मिक कार्यक्रमासाठी ओमान येथे जाणार असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यानुसार झाकीर नाईकला भारतात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. हा झाकीर नाईक नेमका कोण? जाणून घेऊयात सविस्तर.
कोण आहे झाकीर नाईक? :इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक हा मूळचा महाराष्ट्रातील कोकणातला आहे. त्याचा जन्म 1968 साली झाला. त्याचे पूर्ण नाव डॉ. झाकीर अब्दुल करीम नाईक असे आहे. झाकिरचे कुटुंब मुंबईतील मुस्लिम बहुल परिसर म्हणून व गुन्हेगारीसाठी खूप प्रसिद्ध असलेल्या डोंगरी भागात स्थलांतरित झाले. झाकीर नाईकचे संपूर्ण कुटुंब हे वैद्यकीय पेशातले असल्याचे सांगितले जाते. झाकीर नाईकचे वडील देखील डॉक्टर होते. संपूर्ण कुटुंबच वैद्यकीय पेशातील असल्याने झाकीर नाईक देखील डॉक्टर झाला. त्याचा डोंगरी येथे दवाखाना होता. मात्र, त्याचवेळी झाकीर एका इस्लामिक धर्मगुरूंच्या संपर्कात आला आणि त्याचे पूर्ण मतपरिवर्तन झाले.
असा बनला झाकीर इस्लाम प्रसारक : झाकीर नाईक ज्या धर्मगुरूंच्या विचाराने प्रभावित झाला त्यांनी झाकीर नाईकला इस्लामसाठी काम करण्याचा उपदेश दिला. त्यानुसार झाकीरने आपली डॉक्टरी सोडली आणि पूर्ण वेळ धर्मप्रचारासाठी दिला. झाकीर नाईक मुंबईत विविध ठिकाणी जाऊन इस्लाम बाबत व्याख्यान द्यायचा आणि कुरान बाबत लोकांना माहिती द्यायचा. त्याच्या भाषणांमुळे अनेक जण प्रभावित झाले. कालांतराने झपाट्याने झाकीर नाईकची प्रसिद्धी वाढू लागली. त्याला विविध ठिकाणी इस्लाम आणि कुराणबाबत मार्गदर्शन व व्याख्यानांसाठी लोक बोलवू लागली. झपाट्याने वाढलेली झाकीर नाईकची प्रसिद्ध बघून त्याच्या धर्मगुरूंनी त्याला प्रोत्साहित केले.
झाकिरचे करोडो फॉलोअर्स : इस्लामिक राष्ट्र व भारतातील इस्लामिक समाजात झाकीर नाईकची प्रसिद्धी इतकी वाढली की त्याने 1991 साली 'इस्लामिक रिसर्च फाउंडेशन' नावाची संस्था सुरू केली. याच संस्थेअंतर्गत त्याने विविध शाळा देखील सुरू केल्या. सोबतच 'पीस टीव्ही' नावाने एक सॅटॅलाइट टीव्ही चॅनल सुरू केले. झाकीरच हे चॅनल जगभरात अनेक इस्लामिक देशांमध्ये दिसते. जगभरात प्रसिद्धीच्या झोतात असलेला झाकीर आता त्याच्या टीव्ही चॅनलवरून धार्मिक उपदेश देऊ लागला होता. सोशल मीडियावर झाकीरचे एक करोड 70 लाखहुन अधिक फॉलोवर्स आहेत. अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेला झाकीर नाईक भारतातील तपास यंत्रणांच्या नजरेतून लपू शकला नाही. त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात झाले होते. त्याची चौकशी सुरू होणार त्याच आधी तो भारत सोडून मलेशियाला पसार झाला.
नाईक जगाच्या रडारवर : महाराष्ट्राच्या कोकणातून जागतिक पातळीवर प्रसिद्धीच्या झोकात आलेला झाकीर 2008 आणि 2016 साली केलेल्या प्रवचनांमुळे जगाच्या रडारवर आला. 2008 साली त्याने त्याच्या पीस टीव्ही या चैनल वरून ओसामा बिन लादेनचे समर्थन केले होते. तर, 2016 साली बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे काही धार्मिक कट्टर पंथीयांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांना बांगलादेशच्या स्थानिक पोलिसांनी अटक केले. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी आपण झाकीर नाईकची भाषण ऐकून प्रभावित झाले असल्याचे स्थानिक पोलिसांना सांगितले होते.
झाकीर नाईकला ताब्यात घेणार? : दहशतवादी कारवायांना प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या झाकीर नाईकला पुन्हा भारतात आणण्यासाठी भारताच्या गुप्तचर यंत्रणा आता सक्रिय झाल्या आहेत. 2017 साली मलेशियात पळालेल्या झाकीर नाईकला पुन्हा एकदा भारतात आणायला आपल्या भारतीय गुप्तचर यंत्रणांना यश मिळणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : Zakir Naik: झाकीर नाईकच्या मुसक्या आवळणार..? ओमानमधून हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरु