मुंबई:भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर शिवसेना नेते अनिल परब यांचे वांद्रे येथील जनसंपर्क कार्यालयाचे पाडकाम केले. परब यांनी पत्रकार परिषद घेऊन, याबाबत भूमिका स्पष्ट केली. सन १९६० मध्ये म्हाडाच्या बिल्डिंग तयार झाल्या. येथील मी रहिवाशी आहे. माझे बालपण तसेच राजकीय कारकीर्द येथेच घडली. आजवर मला बदनाम करण्याचा प्रयत्न किरीट सोमय्यांनी केला.
वारंवार म्हाडावर दबाव:आज आमदार, माजी मंत्री म्हणून नव्हे तर एक रहिवाशी म्हणून बोलत आहे. म्हाडाच्या जागा आता सोसायटीच्या ताब्यात आहे. येथील रहिवाशांनी सांगितल्यामुळे येथे कार्यालय सुरु केले. परंतु, सोमय्यांनी माझे कार्यालय अनधिकृत असल्याचे भासवत कारवाईची मागणी सातत्याने करत आहेत. सोसायटी मधील रहिवाशांनी परवानगी मागितली. सोमय्यांनी वारंवार म्हाडावर दबाव टाकला, असा गंभीर आरोप परब यांनी केला. तसेच म्हाडाने सोसायटी अधिकृत करण्यास नकार दिल्यानंतर कार्यालयाचे पाडकाम केल्याचे परब यांनी सांगितले.
रहिवाशांच्या मनात भीती :मुंबईत म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत. त्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. सध्या येथे थोड्याशा अधिकच्या जागेवर गरीबांनी आपली घरे वाढवली आहेत. मात्र, बिल्डरांनी केवळ २२० स्क्वेअर फूट नागरिकांना देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोमय्यांनी या अधिकच्या जागेवर आक्षेप घेऊन बिल्डर धार्जिणे भूमिका घेतली आहे. ५६ वसाहतींमधील रहिवाशांच्या मनात यामुळे भीती निर्माण झाली आहे. सोमय्या बिल्डरांकडून सुपारी घेऊन आरोप करत आहेत. माझ्यावर ही भाजप सोमय्यांमार्फत दबाव टाकत आहे. आता म्हाडाची जागा पाहण्यासाठी सोमय्या येत आहेत.