मुंबई:नाशिक मध्ये बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तुलना एमआयएमचे ओवैसी (MIM Owaisi) बरोबर केली होती त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. त्यासाठी आज मनसे कार्यकर्त्यांनी सामना कार्यालयाबाहेर पोस्टर लावत संजय राऊत मशिदीमधील मावळे आहेत का असा थेट सवाल उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याचा विरोध केल्यानंतर, शिवसेनेने राज यांच्याविरोधात दादर भागात पोस्टर लावले होते.
प्रत्युत्तर म्हणून, शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई पोलिसांनी मनसेचा हा प्रयत्न हाणून पाडत पोस्टर जप्त करत ते फाडून टाकले. या पोस्टरमध्ये काल, आज आणि उद्या असे तीन भाग करण्यात आले. होते काल या भागात उद्धव ठाकरे यांचा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो तर, आज या शीर्षकाखाली उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा फोटो दाखवण्यात आलाय. तर, उद्या या भागात फक्त एक प्रश्नचिन्ह दाखवण्यात आले होते.