मुंबई -दिल्लीतील सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू असून या सीमांना छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसोबत युद्ध लढणार आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
माहिती देताना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक शेतकरी दिल्लीत येऊ नये यासाठी सरकारकडून बंदोबस्त लावण्यात आला. चीन आणि पाकिस्तान सीमेवर ज्या प्रमाणे बंदोबस्त लावण्यात येतो, त्याप्रमाणे हा बंदोबस्त लावल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. जनरल डायर प्रमाणे पंतप्रधान नीती आखत असून, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे काम योग्य नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा -सारथी संस्थेला पुण्यात जागा देण्याचा निर्णय
दडपशाहीने आंदोलन संपवण्याचा डाव
दडपशाहीने आंदोलन संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. लोकांना त्यांची ही नीती आवडणार नाही. ही डायर नीती बंद करावी, असे मलिक यांनी केंद्र सरकारला ठणकावले. रस्त्यावर बॅरिकेडच्या भिंती उभारण्यात आल्या असून रस्त्यावर खिळेही टाकण्यात आले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांचे अन्न-पाणी बंद करून त्यांना अडचणीत येतील असा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. हे जनता विसरणार नाही. याचे उत्तर जनता देईल, असा इशारा मलिक यांनी दिला.
आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तयारी
26 जानेवारीला शेतकऱ्यांनी केलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला उग्र स्वरूप प्राप्त झाले होते. आंदोलक शेतकरी थेट लाल किल्ल्यावर जाऊन पोहचले. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी दिल्ली पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे. दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी युद्ध परिस्थितीत ज्याप्रमाणे तयारी करण्यात येते, तशी तयारी केलेली पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर काटेरी तारांचे आवरण घातले असून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाणारे सर्व रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत. तर, तिथेच गाझीपूर सीमेच्या उड्डाणपुलाला किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हेही वाचा -वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या; अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू