मुंबई :रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी झालेल्या भूस्खलनात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने अखेर शोध आणि बचाव मोहीम थांबवली आहे. राज्यमंत्री उदय सामंत यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
एका मृतदेहाची ओळख पटली नाही : पत्रकार परिषदेला संबोधित करताना रायगडचे पालकमंत्री सामंत म्हणाले की, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित अधिकारी तसेच स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. शोधमोहिमेत आतापर्यंत 27 मृतदेह सापडले असून, आणखी 57 जणं बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी ढिगाऱ्यातून एकही मृतदेह सापडला नाही. मृतांमध्ये 12 पुरुष, 10 महिला आणि 4 लहान बालकांचा समावेश आहे. तर एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. बेपत्ता आणि मृतांचा तपशील प्रशासनाकडून मिळू शकतो.
भूस्खलनात 17 घरे गाडली गेली : मुंबईपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या इर्शाळवाडी या दुर्गम आदिवासी गावात 19 जुलै रोजी रात्री 10:30 च्या सुमारास भूस्खलन झाले. भूस्खलनात गावातील 48 पैकी किमान 17 घरे पूर्ण किंवा अंशत: गाडली गेली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि इतर बचाव पथकांनी येथे रविवारी चौथ्या दिवशी शोध आणि बचाव कार्य पुन्हा सुरू केले. शनिवारी संध्याकाळी अंधार आणि खराब हवामानामुळे ते थांबवण्यात आले होते.