मुंबई :जोगेश्वरी (पूर्व) येथे इमारतीवरून पडलेली लोखंडी सळी अंगावर पडल्याने महिलेचा व तिच्या ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरी, पूर्व येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. यात रिक्षात बसलेल्या मायलेकीच्या अंगावर लोखंडी सळी पडली. यानंतर जबर जखमी झालेल्या या दोघांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यात महिलेचा मृत्यू झाला. तर तिची लहान मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू असताना तिचाही मृत्यू झाला आहे.
एआयएम ग्रुप व विकासक मलकानी डेव्हलपर्सच्या इमारतीचे बांधकाम, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत, जोगेश्वरी पूर्वेतील गुंफा रोडवर सुरू आहे. हे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीखाली शनिवारी संध्याकाळी एक रिक्षा उभी होती. त्यात एक महिला आपल्या ७ वर्षाच्या लहान मुलीसोबत बसली होती. त्या दरम्यान अचानक इमारतीवरून एक लोखंडी सळी रिक्षावर पडल्याने मोठा अपघात झाला. या घटनेत या माय लेकी दोघी गंभीर झाल्या. या दोघींनाही तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण तिथे नेल्यावर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. तर मुलीची प्रकृती फार गंभीर होती. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.